बुधवार, १८ मार्च, २०२०

🌹 *सांगू शकलो नाही* 🌹
                    - महेश मोरे (स्वच्छंदी)

ऐनघडीला मनातला सल बोलू शकलो नाही
सांगायाचे बरेच होते.....सांगू शकलो नाही

गोड बोललो आणि सुखाच्या लाख वल्गना केल्या
पण मी डोळ्यांमधले पाणी लपवू शकलो नाही

श्वास पेरुनी जो निष्ठेने जगवत गेला दुनिया
पण अाम्ही त्या शेतकऱ्याला जगवू शकलो नाही

किती उंच अन् किती खुजा मी तुला कसा रे सांगू ?
अजून मी तर मलाच पुरता पाहू शकलो नाही

लाख चेहरे लाख मुखवटे बदलत गेलो मी पण
तव डोळ्यांचा एक आरसा बदलू शकलो नाही

कसा दिसाया मी होतो ते मला आठवत नाही
पण आठवतो तुझा चेहरा...विसरू शकलो नाही

दुपार झाली तरी मला हा प्रश्नच छळतो आहे
तुझ्यासारखी सकाळ मी का पाहू शकलो नाही ?

उत्सुकतेने वाचत गेलो तुझ्या कुडीचे पुस्तक
काय नेमके सुंदर होते ठरवू शकलो नाही

ती स्पर्शाने सगळ्या शंका सांगू शकली नाही
मी ओठांनी सगळ्या शंका मिटवू शकलो नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...