रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

असातसाही जळणारच.....
            - स्वच्छंदी/महेश मोरे

पेटवताना उरातुनी भळभळणारच
मात्र दिवा तो असातसाही जळणारच.

याद कितीही मनामधे या लपवुन बघ
दु:ख नव्या आसवांसवे ओघळणारच

पायदळी या कळ्या कितीही चुरगाळा
गंध तयांचा पुन:पुन्हा दरवळणारच

साद प्रियेची मधूर पडता कानावर
पाय बिचारा नको तिथे बघ वळणारच

सत्य सिकंदर जगास गेला सांगुन की
सुर्य तुझाही कधीतरी मावळणारच

खोल किती तू जिवास द्यावा आयुष्या
घाव असा की भलाभला कळवळणारच

छत्र जिथे तू धरून बसला सरकारा !
त्याच गढीवर समानता कोसळणारच

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

तेव्हापासून.........!
              - स्वच्छंदी

तू मला हेटाळले ........तेव्हापासून
मी मला सांभाळले .....तेव्हापासून

स्तब्ध झाली आसवे डोळ्यांमधली
स्वप्न मी चुरगाळले ......तेव्हापासून

बोलणे होते कुठे हल्ली अपुले
भेटणे तू टाळले .........तेव्हापासून

यातनांना रोज देतो आमंत्रण
दु:ख 'ते' रक्ताळले .....तेव्हापासून

साथ माझी सोडली स्वप्नांनीही
अन् ह्रदय भेगाळले.......तेव्हापासून

मी न माझ्या लागलो बघ हाताला
मन तुझ्यावर भाळले ...तेव्हापासून

मंद झाला काळजाचा ठोकाही
मी तुला कवटाळले ....तेव्हापासून

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

गझल
        घटना महान आहे
                       - स्वच्छंदी

सन्मार्ग दावणारी घटना महान आहे
सत्यार्थ जागणारी घटना महान आहे

जातीत बांधलेल्या अस्पृश्य माणसाला
माणूस मानणारी घटना महान आहे

मांडून ठाण आहे समता जिच्या उराशी
न्यायास तारणारी घटना महान आहे

नारी,दलीत,वृद्ध न निष्पाप शोषितांचे
स्वातंत्र्य मागणारी घटना महान आहे

भेदांस पोसणाऱ्या (क)डव्या मनुस्मृतीच्या
प्रेताव नाचणारी घटना महान आहे

रक्तात पेरली अन् श्वासांत भारलेली
ह्रदयात नांदणारी घटना महान आहे

जाळून काय होते पानांस कागदांच्या
जुलुमास जाळणारी घटना महान आहे

रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

एक मतला दोन शेर.....
                       - स्वच्छंदी

चंद्र,पृथ्वी,सूर्य,तारे आणखी मी काय मागू ?
मस्त मागू जिंदगी की एक माझी माय मागू ?

लाभली नाही जरी रे मज सुखाची सावली मग
जिंदगीला आज माझ्या मी कसा पर्याय मागू ?

जग चुकीचे वाटले अन् लेखणी हातात आली
न्याय केला मी जगाचा मी कुणाला न्याय मागू ?
गझल........
 उंबऱ्याचे माप ओलांडून जाते
                        - स्वच्छंदी

उंबऱ्याचे माप ओलांडून जाते
पोर भलती काळजी लावून जाते

बोलते अन् हासते सवयीप्रमाणे
एक मोठा हुंदका देऊन जाते

पाय घेतो आजही माघार तेव्हा
मात्र अलगद मान ती वळवून जाते

हात 'तो' हातात येता धूंद होते
बापड्याचा हात मग सोडून जाते

लपवितो मी ओंजळीतच आसवे पण
पापण्यांची कोर ओलावून जाते

लागतो गंधार ओल्या आठवांचा
काळजाची तार ती छेडून जाते

पोरगी चतकोर असते काळजाची
जिंदगीचा डोह हेलावून जाते
गझल............

 नाही म्हणू नको ना
                 - स्वच्छंदी/ महेश मोरे

हातात हात येता नाही म्हणू नको ना
ओठात ओठ येता नाही म्हणू नको ना

जे जे सुचेल ते ते गाऊन टाक आता
गाणे गळ्यात येता नाही म्हणू नको ना

दुनिया निजावयाची बघतेस वाट कसली
कैफात रात येता नाही म्हणू नको ना

ज्याला बघावयाला आतूर चांदण्या तो
दारात चांद येता नाही म्हणू नको ना

आता कुठे जरा मी सरकावलीत प्यादी
डावात रंग येता नाही म्हणू नको ना
गझल...........

का डळमळीत होतो हातातला तराजू
                   - स्वच्छंदी

सांगून टाक न्याया घेऊ नकोस बाजू
का डळमळीत होतो हातातला तराजू

का भोगण्यात येते रस्त्यात निर्भयेला
का जात लांडग्यांची ही लागलीय माजू

लुटतात देश ते ते पळतात दूर देशी
नसत्याच बातम्या का मग लागतात गाजू

सोडून टाक पट्टी,उघडेच ठेव डोळे
निर्लज्ज माणसांना बघुनी नकोस लाजू

समता कुठे रहाते दावून भूक जाते
हातात शेंगदाणे म्हणते तयास काजू
गझल......
 चतकोर भाकर
         - स्वच्छंदी

पोर बांधूनी खुटीला मागते चतकोर भाकर
जिंदगानीच्या व्यथा मग सांगते चतकोर भाकर

जाणतो प्रत्येक प्राणी सूत्र हे सत्यातले की
झोपतो श्रीमंत तेव्हा जागते चतकोर भाकर

आतड्यांना पीळ पडता जीव हा कंठात येतो
दुश्मनांच्या सारखी का वागते चतकोर भाकर

भाकरीची टोपली बघ काल ज्या हातांत होती
आज त्यांच्या जिंदगीला भागते चतकोर भाकर

रोख रक्कम, खानदानी बंगले,गाडी कशाला
झोप घ्यायाला नशीबी लागते चतकोर भाकर
गझल......
 काळजाच्या आत धडधड होत गेली
                  - स्वच्छंदी
-----------------------------------------------
काळजाच्या आत धडधड होत गेली
पापणी हलकेच बोजड होत गेली

मी तिला घालून गेलो मागणी अन्
जिंदगीची रोज परवड होत गेली

ऐनवेळी साथ ज्याने द्यावयाची
त्या शरीराचीच पडझड होत गेली

पाय माझा उंबऱ्याला लागला अन्
झोपडी गावास वरचढ होत गेली

जिंदगीचे डाव ना कळले मला मग
जिंदगी भलतीच अवघड होत गेली

 हुंदका बोलून जातो
                   - स्वच्छंदी

मान वळते,चेहरा झाकून जातो
पण प्रियेचा हुंदका बोलून जातो

आसवांचा बांध फुटतो पापणीतच
आठवांचा गाव ओलावून जातो

काळजाच्या आत थरथर होत गेली
पैंजणांचा नाद हे सांगून जातो

लाजणारा चेहरा कोठून आणू
आरशाला मीच समजावून जातो

याद येते का तिलाही रोज माझी
ऊचक्यांनी जीव भंडावून जातो

कोणता संकेत देते जिंदगानी
भारलेला मोगरा वाळून जातो

रातराणी मोगऱ्याला साद देता
काळजाचा घाव भेगाळून जातो

 हुंदका बोलून जातो
                   - स्वच्छंदी

मान वळते,चेहरा झाकून जातो
पण प्रियेचा हुंदका बोलून जातो

आसवांचा बांध फुटतो पापणीतच
आठवांचा गाव ओलावून जातो

काळजाच्या आत थरथर होत गेली
पैंजणांचा नाद हे सांगून जातो

लाजणारा चेहरा कोठून आणू
आरशाला मीच समजावून जातो

याद येते का तिलाही रोज माझी
ऊचक्यांनी जीव भंडावून जातो

कोणता संकेत देते जिंदगानी
भारलेला मोगरा वाळून जातो

रातराणी मोगऱ्याला साद देता
काळजाचा घाव भेगाळून जातो
🌹गझल🌹
-----------------------------------------
              *नक्की*
                   *- स्वच्छंदी*
-----------------------------------------
तिचे वेगळे बेत आहेत नक्की
तसे स्पष्ट संकेत आहेेत नक्की

खुळ्यासारखे हासतो मात्र अमुची
मने हुंदके देत आहेत नक्की

कशी हेलकावून जातेय होडी
कुणी गुंड नावेत आहेत नक्की

तसे भोवताली कळीच्याच काटे
तिची काळजी घेत आहेत नक्की

जगाया शिकावे असे ज्यात नाही
धडे तेच शाळेत आहेत नक्की

गझल वाचताना तिची याद यावी
असे शेर गझलेत आहेत नक्की

किती चाललो पण मला हे कळेना
कुठे पावले नेत आहेत नक्की ?

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

गझल........
            - स्वच्छंदी

शोषकांनी शोषिलेले शोषितांचे रक्त आहे
हे गुलामांच्या मढ्यांवर बांधलेले तख्त आहे

दावणीला बांधलेली शोषितांची जिंदगानी
आज त्याची रोख किंमत एक भाकर फक्त आहे

कोण करतो सांग हल्ली शोषितांची काळजी
देवसुद्धा वाटते त्या शोषकांचा भक्त आहे

काल त्यांनी बंद केली बोलणारी चार तोंडे
आजही त्यांचा पहारा भोवताली सख्त आहे

आजवरती शोषिताला ना दिले बोलून कोणी
वेदना त्याच्या मनाची आजही अव्यक्त आहे

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

गझल.....
जिंदगीचे डाव मोठे बेरके
                      - स्वच्छंदी

जिंदगीचे डाव मोठे बेरके
चेक म्हणणाऱ्या वजीरासारखे

दाखवाया फक्त प्यादे चालते
मग बळी बिन्धास जाती म्होरके

बघ सुखाला झेलतो प्रत्येकजण
दु:ख भोळे होत जाते पोरके

बंदुकांनी ठार ज्यांना मारले
लोक त्यांची बांधताती स्मारके

अन् घरे भूकंप जेव्हा पाडतो
माय मरते पोर उरते बारके

गझल : परवानगी द्या 
             - स्वच्छंदी/ महेश मोरे

 हात गुंफायची परवानगी द्या
ओठ चुंबायची परवानगी द्या

शोध घेईन मी तिचिया तळाचा
खोल डुंबायची परवानगी द्या

बंद होईल तगमग ह्या जिवाची
राज खोलायची परवानगी द्या

वादळांनो कधीही या, परंतू
रान पेरायची परवानगी द्या

दोष होता कुणाचा सांगतो मी
दोष शोधायची परवानगी द्या

भूक ताटात येताना म्हणाली
कोर मागायची परवानगी द्या

शुभ्र सदऱ्यातही शोभेन मी बस्
झूठ बोलायची परवानगी द्या

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...