रविवार, २९ मार्च, २०२०

🌹 *याहुनी माझी अवस्था वेगळी नाही* 🌹
            *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


ऊन छळते अन् कुठेही सावली नाही
याहुनी माझी अवस्था वेगळी नाही

दु:ख ज्याला भेटले..दु:खात तो आहे
सुख मिळाले ज्यास तो..तो ही सुखी नाही

टाकला गळ की गळ्याला लागण्यासाठी
पोरगी म्हणजे नदीची मासळी नाही

प्रेम असते आंधळे हे मान्य आहे पण
जन्म म्हणजे आंधळी कोशिंबिरी नाही

एक हा बस् प्रश्न पडतो रोज ताटाला
पोट आहे, भूक आहे... भाकरी नाही

फक्त दु:खांनीच सजले बंगले इथले
एकही उरली सुखांची झोपडी नाही

एवढ्यातच तू नको रे थांबवू लढणे
एवढ्यातच ही लढाई संपली नाही

शनिवार, २८ मार्च, २०२०

सोमवार, २३ मार्च, २०२०

🌹 *अजून मिळते का ?* 🌹
             *- महेश मोरे ( स्वच्छंदी)*

वेदना भरभरून मिळते का ? 
सोसल्याने अजून मिळते का ?

शोधण्यातच गड्या दिवस जातो
दु:ख केवळ बसून मिळते का ?

सूर जुळल्यामुळेच तर मिळते
प्रेम 'मिळते म्हणून' मिळते का ?

वेळ मिळताच घ्यायचे असते
एक चुंबन शिकून मिळते का ?

वर्तनाचा सुवास दरवळतो
नाव केवळ झिजून मिळते का ?

प्रेमभंगात फाटले आहे
हृदय कोठे शिवून मिळते का ?

काळजावर लिहून जे मिळते
कागदावर लिहून मिळते का ?

रविवार, २२ मार्च, २०२०

दिल्या शब्दास होतो जागलो                 
       - महेश मोरे (स्वच्छंदी)

गळा कटला तरी ना बोललो
दिल्या शब्दास मी ही जागलो

जलम काटा म्हणुन सरला तरी
कधी कोणास नव्हतो टोचलो

हवा झालो नि झालो श्वास पण
तुझ्या हृदयात नाही पोचलो

परत येणार तर नव्हतीस तू
गडे मी वाट पाहत थांबलो

तुझ्या गझलेत झालो काफिया
अलामत घेत रमलो, गुंतलो
तू गेल्यावर तुला आठवत नको एवढा रडलो होतो
आज मला ते आठवले अन् किती हसावे कळले नाही

# *- स्वच्छंदी*

बुधवार, १८ मार्च, २०२०

🌹 *सांगू शकलो नाही* 🌹
                    - महेश मोरे (स्वच्छंदी)

ऐनघडीला मनातला सल बोलू शकलो नाही
सांगायाचे बरेच होते.....सांगू शकलो नाही

गोड बोललो आणि सुखाच्या लाख वल्गना केल्या
पण मी डोळ्यांमधले पाणी लपवू शकलो नाही

श्वास पेरुनी जो निष्ठेने जगवत गेला दुनिया
पण अाम्ही त्या शेतकऱ्याला जगवू शकलो नाही

किती उंच अन् किती खुजा मी तुला कसा रे सांगू ?
अजून मी तर मलाच पुरता पाहू शकलो नाही

लाख चेहरे लाख मुखवटे बदलत गेलो मी पण
तव डोळ्यांचा एक आरसा बदलू शकलो नाही

कसा दिसाया मी होतो ते मला आठवत नाही
पण आठवतो तुझा चेहरा...विसरू शकलो नाही

दुपार झाली तरी मला हा प्रश्नच छळतो आहे
तुझ्यासारखी सकाळ मी का पाहू शकलो नाही ?

उत्सुकतेने वाचत गेलो तुझ्या कुडीचे पुस्तक
काय नेमके सुंदर होते ठरवू शकलो नाही

ती स्पर्शाने सगळ्या शंका सांगू शकली नाही
मी ओठांनी सगळ्या शंका मिटवू शकलो नाही

रविवार, १५ मार्च, २०२०

🌹 *पापण्यांमध्ये समूद्र साचत जातो* 🌹
                   *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


क्षण एखादा असा आठवत जातो
पापण्यांमध्ये समूद्र साचत जातो

कराल जितकी नात्यांसोबत सलगी
तितका त्यांचा गुंता वाढत जातो

सरळ चालतो रस्तासुद्धा इथला
मी जेव्हा रस्त्याने चालत जातो

खोटा बस् आगीने काळा पडतो
अस्सल असतो तोच लकाकत जातो

येताना तर सगळे रडले होते
मर्द खरा दुनियेला हसवत जातो

शेर नि गझला निमित्त असते केवळ
गझलकार तर दु:खे वेचत जातो

धग जगण्याची ज्याच्यामध्ये असते
तो लाथेने दु:खे उडवत जातो

खरी गुलाबी प्राजक्ताची भाषा
आपण वेडे गुलाब शोधत जातो

जितका ज्यादा भाव द्याल पोरींना
तितका त्यांचा नखरा वाढत जातो

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

🌹 *ठरलेली* 🌹
            *- महेश मोरे (स्वच्छंदी)*

सुख-दु:खांची टक्केवारी ठरलेली
आयुष्याची दुकानदारी ठरलेली

मित्र नि शत्रू, अपुले-परके ठरलेले
ज्याची त्याची हिस्सेदारी ठरलेली

खरे पुरावे किती जरी सादर केले
निकालामधे तिची हुशारी ठरलेली

व्यापांमध्ये आठवडा तर जातो पण
तिची आठवण दर रविवारी ठरलेली

जन्म मुलीला देऊ शकलो नाही तर
आयुष्यावर एक उधारी ठरलेली

शिकलो नाही तर जन्माचे वाटोळे
अन् शिकल्यावर ही बेकारी ठरलेली

शक्ती-बुद्धी दोघी बहिणी नशिबाच्या
एक भिकारी एक जुगारी ठरलेली

गुरुवार, १२ मार्च, २०२०

🌹 *लागला मृदुगंध जेव्हा दरवळू* 🌹
                           *- स्वच्छंदी*


लागला मज अर्थ जगण्याचा कळू
लागला मृदुगंध जेव्हा दरवळू


ये पुन्हा भेटू नव्याने एकदा
ये पुन्हा मिसळून जाऊ..विरघळू

सांग तू आता तरी इच्छा तुझी
या जगासाठीच कुठवर मी ढळू ?

बोललो मी बस् तुझ्याबद्दल जरा
लागल्या जखमा जुन्या मग भळभळू

आठवण आली तिची की लागतो
एक अश्रू कारणाविन ओघळू

रात्र ही ठरवून हाका मारते
सूर्य हा ठरवून म्हणतो मावळू

लागला जर का सुगावा 'त्या' तिचा
लागतो हा श्वास मागे घुटमळू

मंगळवार, १० मार्च, २०२०

💓 *अन् पावसाची एक सर* 💓
                *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


आठवांचे वाळवण अन् पावसाची एक सर
तो जुना एकेक क्षण अन् पावसाची एक सर


काळ सरला केवढा पण आजही छळते मला
'ती'....तिची 'ती' आठवण अन् पावसाची एक सर

मी खुबीने लपविली होती जखम हृदयामध्ये
वर गुलाबी आवरण अन् पावसाची एक सर

ते तिच्या-माझ्यातले संदर्भ होते वेगळे
वेगळे वातावरण अन् पावसाची एक सर

दोन गोष्टी कालच्याइतक्याच ओल्या आजही
काळजाच्या आत व्रण अन् पावसाची एक सर

सोमवार, ९ मार्च, २०२०

*तुझा रंग कोणता ?*
          *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


अशाच एका रंगपंचमीच्या सायंकाळी...
दिवसभर एकमेकांवर
उधळलेले रंग..
तळहातावर घेऊन
मिरवित बसलो होतो
तू आणि मी...
रंगविहीन पाण्यासह खळाळणाऱ्या निळ्याशार नदीच्या काठावर..
मी तुला सहज विचारलं
तुझा रंग कोणता ?

माझ्या अभिजात रंगावर बोट ठेवून तू अगदी सहज म्हणाली होतीस..हा माझा.

तेव्हापासून आजपर्यंत
आयुष्याचे इतके क्षण, इतके दिवस, इतक्या रात्री अन् इतकी वर्षे गेली...
बघ नं कित्ती सहज बदलत गेलं आयुष्य...
आणि आयुष्याचे इंद्रधनुष्य...

कित्येक रंगानी नाकारलं आपल्याला
आणि आपण कित्येक रंगांना...
पण वाट्याला आलेल्या प्रत्येक रंगात माझ्यासोबत मिसळत गेलीस ..
आणि ठाम राहिलीस तू माझ्या आयुष्यात...
माती झाडासोबत राहते ना...?
अगदी तश्शी.

आज तब्बल चाळीसेक वर्षांनंतर तोच दिवस आलाय बहुधा
आणि तशाच एका वळणावर मी उभा आहे
तुझ्या नि माझ्या आयुष्यातला एकेक रंग तळहातावर घेऊन
तुझ्यासमोर..
अगदी तस्साच....

सांगशील का आता तरी

तुझा रंग कोणता ?

गुरुवार, ५ मार्च, २०२०

🌹 *भरभर वाढत जाते* 🌹
                     *- स्वच्छंदी*


देहामधली, रक्तामधली थरथर वाढत जाते
तिला पाहिले की श्वासांची घरघर वाढत जाते


या ओठांनी त्या ओठांना थोडी द्यावी...घ्यावी
नाहीतर मग रक्तामधली साखर वाढत जाते

असा अबोला धरल्याने दुनियेचे बिघडत नाही
बस् दोघांच्यामधले थोडे अंतर वाढत जाते

नजर गुलाबी मुसमुसलेली असेल जर दोघांची
वयाबरोबर प्रेमामधले अत्तर वाढत जाते

वेल जशी त्या म्हाताऱ्या खोडावर वाढत जाते
लेक लाडकी बापाच्या खांद्यावर वाढत जाते

दिवा विझवल्यानंतर छळतो प्रश्न तिच्या स्पर्शाचा
वाढत जाते रात्र तसे मग उत्तर वाढत जाते

जमेल तेव्हा मिठीत घ्या..द्या ओलावा प्रेमाला
प्रेम बघा मग कसे भराभर भरभर वाढत जाते

मंगळवार, ३ मार्च, २०२०

🌹 *हरएक श्वासात भिनतेस तू* 🌹
                           *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


ठरवून देतो शहारा शरीरास त्या गूढ स्पर्शात असतेस तू
भरतेस अस्सल सुखांनीच आयुष्य अन् धुंद बरसात करतेस तू


हळुवार स्पर्शून जाते किनाऱ्यास ती लाट पाण्यातली तू सखे
पाण्यास असते तुझी काळजी आणि अपुल्याच खेळात रमतेस तू

तो चंद्र फिरतो जसा भोवताली नि धरणी जशी त्यास दुर्लक्षिते
मी घालतो नित्य घिरट्या तशा आणि अपुल्याच नादात फिरतेस तू

भिनतो फुलारून प्राजक्त देहात तेव्हा तुझी याद येते मला
अन् श्वास होतो गुलाबी गुलाबून ज्या रंग-गंधात खुलतेस तू

अत्तर जसे गंध देते स्वभावास भिनते जसे रोमरोमामध्ये
अगदी तशी हाय ! हरएक स्वप्नात, हरएक श्वासात भिनतेस तू

रविवार, १ मार्च, २०२०

🌹 *जर - तर नको* 🌹
             *- महेश मोरे (स्वच्छंदी)*

हा जर नको, हा तर नको, जर-तर नको
प्रतिसाद दे पण लग्न झाल्यावर नको

हा कोणता माझा नि कुठला तो तुझा
हा वाद श्वासांच्यामधे नंतर नको

ओठामुळे ओठातली...वाढेल पण
वाढायला रक्तातली साखर नको

इतक्याचसाठी राहिल्या भिंती उभ्या
घर बांधणारा व्हायला बेघर नको

अंतर जरा ठेवून मजशी बोल तू
लागायला माझे तुला अत्तर नको

बस् एक दे पण कृष्णकान्हासारखा
मोजायला नुसती मुले शंभर नको

'ती' जोवरी येणार नाही भेटण्या
संपायला श्वासांतली घरघर नको

स्पर्शातले शोधून काढू दे मला
ओठातुनी देऊस तू उत्तर नको

जर यायचे तर एकदा सत्यात ये
जागायला नुसतेच स्वप्नावर नको

बस् याचसाठी बोललो खोटे गड्या
की व्हायला आरोप सत्यावर नको

शोधायचा आहेच तळ हृदयातला
मग आत ये ! थांबूस काठावर नको

बिनधास्त माझे नाव दे दु:खास तू
याच्यापरी माझा करू वापर नको

इतक्याचसाठी मी जवळ आलो तुझ्या
वाढायला अपुल्यातले अंतर नको

तू दूर हो आताच कोल्ह्यांपासुनी
वाघा ! तुझे जर व्हायला मांजर नको

जर देवपण आहे तुला मिळवायचे
ठेवूस मग तू भिस्त देवावर नको

सोसू खुबीने त्यातल्या सल वेदना
सोडायला पण दु:ख वाऱ्यावर नको

जोवर तुझ्या हातात आहे धर मला
सांगूस नंतर हक्क माझ्यावर नको

गेला मला देऊन धोका मोगरा
आता तुझा जास्वंद - गुलमोहर नको

तू हात तर आहेस हाती घेतला
सोडू मला भलत्याच वळणावर नको

तू प्रश्न दे जितके हवे तितके मला
देऊस पण कोड्यातले उत्तर नको

तेव्हा तिला डबक्यापरी वाटायचो
आता तिला माझ्यातला सागर नको

जमणार नसले तर मला सोडून जा
आत्म्या!  तुझा उपकार देहावर नको

प्रेमामधे इतका बुडावा जीव की
राहायला हा श्वास थाऱ्यावर नको

मृत्यू हवा मज व्हायला सूर्यापुढे
पण जन्म अंधारातला क्षणभर नको

ह्या माणसांमधला मला माणूस दे
मंदिर नको अन् त्यातला पत्थर नको

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...