गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

🌹 *कुठल्या स्तरात आहे ?* 🌹
                       *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


नजरेमध्ये तिच्या की माझ्या मनात आहे ?
विरहामधील वादळ कुठल्या स्तरात आहे ?


गीता कुराण वाचा वा बायबल तपासा
सद्धर्म माणसाचा सांगा कशात आहे ?

राहील तोवरी 'ती' हृदयात ठाण मांडत
जोवर तुझ्या नि माझ्या तोंडात जात आहे

ठरवून ईश्वराने केली असेल रचना
हा देह मोकळा अन् मन पिंजऱ्यात आहे

लाथाडली सुखे अन् दु:खांस वाह म्हटला
तो सावलीत होता.....आता उन्हात आहे

सोमवार, २७ जानेवारी, २०२०

🌹 *मिसळून चाललो* 🌹
                      *- स्वच्छंदी*

मातीत देह अख्खा मिसळून चाललो
ठरवून मीच माझ्या जवळून चाललो

हा श्वास शेवटाचा घेऊन सोडला
देहातुनी तसा मी उसळून चाललो

कमवून ठेवले ते येथेच राहिले
अन् जे उरात उरले...उधळून चाललो

मैफिल जगाबरोबर केव्हाच संपली
होता तसाच प्याला विसळून चाललो

आली सकाळ माझ्या नशिबात नेमकी
अन् मी दवाप्रमाणे निथळून चाललो

गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

🌹 *दखल जगाने घ्यावी म्हणुनी* 🌹
                   *- महेश मोरे (स्वच्छंदी)*

कधी न केला भांडणतंटा कधी भडकलो नाही
दखल जगाने घ्यावी म्हणुनी कधीच लढलो नाही

असाच नुसता लढलो असतो..कधीच हरलो असतो
सुला न केला आयुष्याशी म्हणून हरलो नाही

प्रियेप्रमाणे माझी सोबत असून सोबत माझ्या
उभ्या जगाला कळलो मी पण मलाच कळलो नाही

मनी भिनवल्या जाती अमुच्या मनूस्मृतीने इतक्या
जरी बदलली अख्खी दुनिया तरी बदललो नाही

रडू न आले ऐनघडीला म्हणून रडलो होतो
हसावयाला जमले नाही म्हणून हसलो नाही

तिच्याबरोबर होतो म्हणुनच टिकून होतो मित्रा
तिला वगळल्यावर 'मी' माझ्या उरात उरलो नाही

विराट वादळ संघर्षाचे समोर जेव्हा होते
लढून चिंध्या झालो पण मी पुढ्यात झुकलो नाही

तिच्याबरोबर चालत गेलो म्हणेल तितके अंतर
थकून गेलो इतका की मग वळूच शकलो नाही

शनिवार, १८ जानेवारी, २०२०

🌹 *जसे जगाला दिसतो आपण* 🌹
                        *- महेश मोरे (स्वच्छंदी)*

आनंदाचा खोटा अभिनय करतो आपण
तसेच नसतो..जसे जगाला दिसतो आपण

माहित असते 'त्याच्या'नंतर काही नाही
आयुष्यावर उगाच चर्चा करतो आपण

जे आहे ते वाटत बसतो जगास अवघ्या
अपुल्यासाठी कोठे शिल्लक उरतो आपण

हसणाऱ्याला हसताना हे माहित असते
किती खरे अन् खोटेखोटे हसतो आपण

'जो' आहे की नाही याची खात्री नाही
त्याच्यासाठी उगाच दंगे करतो आपण

घर म्हटले की भांडणतंटा होणारच ना ?
वाद जगाला उगाच सांगत बसतो आपण

आयुष्याची कधी स्वत:च्या चिंता नसते
तर मग चिंता खरी कुणाची करतो आपण ?

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

🌹 *जिंदगी तिळगूळ झाली* 🌹
                     *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


तीळ झाली, गूळ झाली, जिंदगी तिळगूळ झाली
घेतले आकार सगळे....शेवटी वर्तूळ झाली


गोड होतो पक्व आंबा...तेवढी ती गोड झाली
चिंच झाली,बोर झाली, मग जरा जांभूळ झाली

हारली युद्धात याचे वाटले वाईट नाही
वाटले याचेच..नंतर माणसे गांडूळ झाली

सागराला भेटण्याआधी नदी ही शांत होती
गाज 'त्याची' ऐकली मग नेमकी व्याकूळ झाली

काळजाला वेदनांच्या वाळवीने स्पर्श केला
काळजामधली व्यथा मग वाढली..वारूळ झाली

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

❣ *माझी गझल बोलते* ❣
                      *- महेश मोरे (स्वच्छंदी)*

हृदय हे धडकते तिच्या आठवांनी नि रक्तातुनी फक्त ती वाहते
किती यत्न केला तिला टाळण्याचा तिची याद ठरवून गंधाळते

विरह काळजाला असा टोचतो की जखम देत जाते व्यथा आतली
तिला वाटते मी तिला टाळतो अन् मला वाटते ती मला टाळते

मुखवट्यावरी भाव आणा कसाही कितीही धरा रोखुनी हुंदके
कितीही करा शर्थ लपवायची पण खरे काय ते पापणी सांगते

अशी ती सुगंधीत होवून येते जशी रातराणी जसा मोगरा
तशी वाढते रात्र कैफातली अन् तिचे स्वप्न तेथेच रेंगाळते

गुलाबी-गुलाबी, नशीले-नशीले असे बोलणे येत नाही मला
जशा बोलण्याची तिला आस असते..तिचे ओठ, माझी गझल बोलते

मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

🌹 *ये भेटाया* 🌹
             *- महेश मोरे (स्वच्छंदी)*

निरोप द्याया...म्हणून ये पण ये भेटाया
मला छळाया...म्हणून ये पण ये भेटाया

कळेल सगळ्या जगास 'भलतेसलते' अपुले
नको कळाया...म्हणून ये पण ये भेटाया

जमेल तितके लिहून गेलो आयुष्यावर
मरण लिहाया...म्हणून ये पण ये भेटाया

असेल बाकी तुला दिलेल्या वचनांची तर
हिशोब घ्याया...म्हणून ये पण ये भेटाया

भल्या पहाटे मिठीत दु:खे भिजली होती
तसे भिजाया...म्हणून ये पण ये भेटाया

रविवार, ५ जानेवारी, २०२०

🌹 निश्चित 🌹
            - महेश मोरे (स्वच्छंदी)

प्रेम असतो 'आंधळा आजार' हे निश्चित
वेळ आल्यावर तुला होणार हे निश्चित

मस्त सजवा अन् कितीही अत्तरे लावा
देह सरणावर गड्या जळणार हे निश्चित

मानता अस्तित्व येते ह्या मनाचे पण
सांगता येतो कुठे आकार हे निश्चित

फार हसते ती गड्यांनो आज माझ्यावर
मी न दिसलो तर उद्या रडणार हे निश्चित

माहिती नाही मिळाले काय रामाला
रावणाचा जाहला उद्धार हे निश्चित

जे तुझे नाही तुला मिळणार नाही पण
जे तुला मिळणार ते मिळणार हे निश्चित

एकदा केला जरी सत्कार माझा तू
राहतो आयुष्यभर उपकार हे निश्चित

गुरुवार, २ जानेवारी, २०२०

🌹 *झिजून गेली पादत्राणे* 🌹
                *- महेश मोरे (स्वच्छंदी)*

टाचा झिजल्या, झिजून गेली पादत्राणे
तरी घेतली गड्या तुझी ना दखल जगाने

भाळी होता फक्त दिलासा आभाळाचा
पाण्यासाठी तहानलेली होती राने

सुखे कधी ना दिलीस मजला आयुष्या तू
कसा करू मी सुला तुझ्याशी आनंदाने

निर्णय कुठला चर्चासुद्धा कठीण ठरते
बैठकीत जर चुकून बसले चार शहाणे

जागा असतो तेव्हा छळते याद तिची अन्
स्वप्नामध्ये तिचेच असते येणे-जाणे

जमेल तितके चल नजरेने बोलू आपण
अडखळायला उगा कशाला उकार, काने

जाणायाचे असेल त्याने घ्यावा पंगा
झळ दु:खांची कशी कळावी अंदाजाने

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...