गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

❤ *गझल...माय मराठी* ❤
                 *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


दुसऱ्याच्या आईला आई मानत जातो आपण
मग का रे 'अपुल्या' आईला विसरत जातो आपण ?

हसवत-रडवत-घडवत जाते भाषा आयुष्याला
ती सापडते जिथे मराठी शोधत जातो आपण

माय मराठी जन्मानंतर आई होते अपुली
तिच्या दुधावर पिढ्या आपल्या जगवत जातो आपण

मातीमध्ये तिच्या रांगतो म्हणून ध्यानी ठेवा
ठसा जगाच्या पाठीवरती उठवत जातो आपण

कधीकधी तर तिची अस्मिता इतकी प्यारी ठरते
अटकेच्याही पल्याड घोडी फेकत जातो आपण

*अधिकचे वेगळे शेर.......*

नजरेमधली,ओठांमधली अतर्क्य असते भाषा
प्रेमामध्ये पडल्यानंतर समजत जातो आपण

मराठीत दुसऱ्यांची पोरे ..अपुली इंग्लिसमध्ये
काळ बदलला म्हणतो अन् मग बदलत जातो आपण

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

🔥 *द्या हमी* 🔥
           *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


शक्य झाले तर नभाची द्या हमी
वावराला पावसाची द्या हमी

कर्जमाफीची गरज नाही मला
फक्त ठरलेल्या दराची द्या हमी

द्यायची असलीच तर कर्जामुळे
फास घेणाऱ्या जिवाची द्या हमी

स्थापण्या सरकार देता ना ?..तशी
तूर मुग अन् कापसाची द्या हमी

ईश्वराबद्दल मला सांगू नका
माणसाला माणसाची द्या हमी
याचा झालो, त्याचा झालो, माझा झालो
                        - स्वच्छंदी

याचा झालो, त्याचा झालो, माझा झालो
आधारच मग मी माझ्या जगण्याचा झालो

जन्म जरी मी आईच्या पोटीच घेतला
देशासाठी लढलो अन् देशाचा झालो

झेंडा होण्याआधी साधे कापड होतो
रंग लागला ज्याचा त्या धर्माचा झालो

टीपकागदा सारखी तऱ्हा माझी झाली
दु:खांनी सुकलो अश्रूंनी ओला झालो

समुद्र होणे माझ्यासाठी सोपे नव्हते
झरा जाहलो, खळाळणारा ओढा झालो

कातरवेळी मिठीत आली माझ्या ती अन्
क्षणात एका गुलाम आयुष्याचा झालो

मला सुगंधी चंदन होणे जमले नाही
फळे लगडली..बुंधा ज्या झाडाचा झालो

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

वृत्त... *गंधप्रिया*
           

लगावली  : गालगागा गालगागा गाललगा

🌹 *काय करू ?* 🌹
                 *- महेश मोरे (स्वच्छंदी)*

'त्या' गुलाबाच्या मिठ्यांचे काय करू ?
'त्या' मिठीमधल्या क्षणांचे काय करू ?

हुंदका आहे विचारत रोज मला
जीवघेण्या आठवांचे काय करू ?

आत लपवू की रचू त्यातून गझल
तू दिलेल्या वेदनांचे काय करू ?

हात हाती घेत असता काल मला
लागलेल्या अत्तरांचे काय करू ?

जी फुले फुलली..उधळली, मान्य जरी
सांग फुलणाऱ्या कळ्यांचे काय करू ?

आपले नव्हतेच केले दूर तयां
आपले आहेत त्यांचे काय करू ?

चेहऱ्यावरचे लपवले सर्व चरे
काळजावरच्या व्रणांचे काय करू ?

आवडू जर लागले तुज हारतुरे
मी जमवलेल्या फुलांचे काय करू ?

पापण्या मिटतीलसुद्धा ऐन क्षणी
पापणीभर आसवांचे काय करू ?

मुखवटा तर घेतला बदलून प्रिये
आतमधल्या भावनांचे काय करू

तू भले झाकून घेशिल देह तुझा
माणसांतिल रावणांचे काय करू ?

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

🌹 आठवणींची चंगळ झाली 🌹
                - महेश मोरे ( स्वच्छंदी)


कधी नव्हे ती आठवणींची चंगळ झाली
व्यथा मनातच उंच वाढली...बाभळ झाली

विसरुन गेलो होतो सगळ्या जुनाट जखमा
तिची आठवण आली अन् मग भळभळ झाली

जगाबरोबर लढून गेलो सहजासहजी
स्वत:बरोबर लढताना तारांबळ झाली

कातरवेळी तिची आठवण उरात शिरली
एक झुळुक मग बघताबघता वादळ झाली

फक्त नदीने वळतावळता नजर वळवली
आणि झऱ्याची खळखळ खळखळ खळखळ झाली

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

🌹 *कळला नाही काटा* 🌹
               *- महेश मोरे (स्वच्छंदी)*

हृदयामध्ये कधी कुणाच्या घुसला नाही काटा
फुले टोचली जितकी 'तितका' सलला नाही काटा

फुलास टोचत होता काटा..हे दुनियेला कळले
'वाचवणारा' फुलास कोणा कळला नाही काटा

स्वत: होवुनी कधी कुणाशी मस्ती नाही केली
फक्त टोचला त्याला...ज्याला दिसला नाही काटा

फुले मिळाली, फळे मिळाली झाडाला नशिबाने
पण झाडाच्या नशिबामधला चुकला नाही काटा

काट्यासोबत फुले राहिली..टोचाया शिकली पण
फुलांबरोबर राहूनसुद्धा फुलला नाही काटा

प्रेम एकदा त्याने केले फुलावरी 'इतके' की
फुलास सलण्याइतकासुद्धा उरला नाही काटा

वेळप्रसंगी कुजून गेला, जळूनसुद्धा गेला
पण कोणाच्या पुढे कधीही झुकला नाही काटा

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...