रविवार, २९ डिसेंबर, २०१९

🌹 *उरात शिल्लक आहे* 🌹
                    *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


छबी गुलाबी फुलासारखी मनात शिल्लक आहे
तिची आठवण बनून धडधड उरात शिल्लक आहे


सुकून गेल्या फुलाप्रमाणे निघून गेली ती पण
तिचाच दरवळ तिने दिलेल्या फुलात शिल्लक आहे

अफाट थंडी असेल पडली बघायला 'हे' केवळ
किती धगाटा अजून इथल्या उन्हात शिल्लक आहे

धुक्यात जेव्हा पुन्हा हरवलो..कळून चुकले 'हे' की
स्पर्श प्रियेचा अजून ओल्या दवात शिल्लक आहे

कसा म्हणू 'तो' निघून गेला निघून गेल्यावरही
गझल व्यथांची लिहून जो ह्या जगात शिल्लक आहे.

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

🌹 *तुझ्या शहरात आल्यावर* 🌹
                                           *- स्वच्छंदी*

विसरलो गाव माझा मी तुझ्या शहरात आल्यावर
भुलू मी लागलो रस्ता...तुझ्या रस्त्यात आल्यावर

विचारत कोणही नव्हते जरी माझ्याच नावाला
मिळाली केवढी किंमत 'तुझ्या' नावात आल्यावर

म्हणाली चुंबल्यावर 'ती', "सख्या नव्हते कधी इतके
गुलाबी ओठ झाले बघ तुझ्या ओठात आल्यावर"

जरी नव्हती पुरेशी लय..जगाला फार आवडली
व्यथा ठरवून 'ही' माझी-तुझी गाण्यात आल्यावर

जिची केवळ छबी बघण्यात जातो रातदिस माझा
कसा मी आवरू मजला सखी स्वप्नात आल्यावर ?


Extra political शेर...


चुकीचे स्थळ स्विकारावे नि व्हावा नेमका पोपट
असे का वाटले त्याला नव्या पक्षात आल्यावर ?

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

🌹 *दिले शहरास गावाने* 🌹
                          *- स्वच्छंदी*


हवे होते स्वत:ला ते दिले शहरास गावाने
दिला काढून शहराला मुखाचा घास गावाने


जसा पाळायला जमला तसा तो पाळलादेखिल
परंतू गमविला नाही कधी विश्वास गावाने

कुणाला माय नव्हती,बाप नव्हता, घर जरी नव्हते
उपाशी ठेवले नाही कधी कोणास गावाने

चुकुनही ना दिला त्याने कधीही त्रास शहराला
गळ्याला लावला अपुल्या जरी गळफास गावाने

रहाया ना दिली जागा जिथे शहरास शहरांनी
तिथे वाटून अर्धे घर दिले गावास गावाने

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

❣ *स्वप्नाला अंकुर फुटतो* ❣
                            *- स्वच्छंदी*


ती केवळ दिसली तरिही स्वप्नाला अंकुर फुटतो
नजरेतुन माझ्या नकळत शर नजरेचा भिरभिरतो


तो असतो बाजीगर या भर प्रेमाच्या दुनियेचा
ह्या 'असली' मस्तानीवर जो जीव स्वत:चा लुटतो

ती समोर असते तेव्हा बोलाया धजवत नाही
ती नसते तेव्हा i luv u मी स्वत:शीच पुटपुटतो

रात्रीसही खेळ अमुचा थांबवून थांबत नाही
ती स्वप्नामध्ये येते अन् मी झोपेतुन उठतो

मी किती जरी केला ह्या देहाचा चंबू उपडा
सल सारा निथळुन जातो अन् तिचाच दरवळ उरतो
तुझ्या रक्तात 'तो' आहे, तुझ्या देहात 'तो' आहे
नको शोधूस त्याला तू, तुझ्या श्वासात 'तो' आहे

म्हणा विठ्ठल, म्हणा येशू, तथागत बुद्ध वा अल्ला
हवे ते नाव त्याला द्या दिल्या नावात 'तो' आहे

                                   *- स्वच्छंदी*

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

🌹 *सजा आहे कशाबद्दल ?* 🌹
                  *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


सजा मी भोगतो आहे 'न केलेल्या' गुन्ह्याबद्दल
मला हेही न माहित की, सजा आहे कशाबद्दल ?


कधीही स्पर्शिले नसते तुझ्या ओठांस ओठांनी
मला जर कल्पना असती गुलाबी सापळ्याबद्दल

जरी गझलेत आली अन् व्यथा शेरात भळभळली
कुठेही बोललो नाही सखे माझ्या-तुझ्याबद्दल

मला तर शाश्वती नाही गड्यांनो आजबद्दलही
उद्याचे काय सांगू अन् कसा बोलू उद्याबद्दल ?

मला विसरून गेली ती क्षणी दुसऱ्याच कायमची
इथे मी बोलतो आहे किती वर्षे जिच्याबद्दल

बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

🌹 वाटले होते मला 🌹
            - महेश मोरे (स्वच्छंदी)


जे सोसल्यावर वाटले होते मला
ते दु:ख सुंदर वाटले होते मला


ओठात आले अन् गुलाबी जाहले
ते ओठ साखर वाटले होते मला

तेथेच शिजले कट मला मारायचे
जे 'आपले' घर वाटले होते मला

जे स्वप्न ती दावून गेली शेवटी
माझेच क्षणभर वाटले होते मला

इतुकेच तर होते तसे दोघांमधे
पण फार अंतर वाटले होते मला

रविवार, ८ डिसेंबर, २०१९

वृत्त : स्वैरिणीक्रीडन
          (दोन वेळेस स्रग्विणी)

लगावली :
गालगा गालगा गालगा गालगा
गालगा गालगा गालगा गालगा
             (आठ वेळेस गालगा)


     🌹 जे मला पाहिजे ते तिला भेटते 🌹
                              - महेश मोरे (स्वच्छंदी)


जे मला पाहिजे ते तिला भेटते, जे तिला पाहिजे ते मला भेटते
शेर असतो खरा मालकीचा तिच्या अन् मला नेमकी वाहवा भेटते


फक्त हातामध्ये वेळ असली म्हणुन होत नाही गड्या माणसाचा विजय
जिद्द श्वासांत घेऊन जो धावतो त्यास जी पाहिजे ती दिशा भेटते

दु:ख सोसायची ज्यात असते धमक दु:ख त्याच्याकडे येत नाही कधी
ज्या नशिबास नसते व्यथांची सवय वाटणीतून त्याला व्यथा भेटते

फार आहे सुखी ऐकल्यावर गड्या चांगला दोस्तही तोंड वेंगाडतो
वेचतो दु:ख अन् मांडतो शेर मी, दु:ख ऐकून मग वाहवा भेटते

वाट पाहत तिची आज आहे उभा बघ जिथे ती न् मी रोज भेटायचो
एक घेऊन आशा मनाशीच की बोलली काल होती 'पुन्हा भेटते'
.   🌹 जे मला पाहिजे ते तिला भेटते 🌹
                            - महेश मोरे (स्वच्छंदी)


जे मला पाहिजे ते तिला भेटते, जे तिला पाहिजे ते मला भेटते
शेर असतो खरा मालकीचा तिच्या अन् मला नेमकी वाहवा भेटते


फक्त हातामध्ये वेळ असली म्हणुन होत नाही गड्या माणसाचा विजय
जिद्द श्वासांत घेऊन जो धावतो त्यास जी पाहिजे ती दिशा भेटते

दु:ख सोसायची ज्यात असते धमक दु:ख त्याच्याकडे येत नाही कधी
ज्या नशिबास नसते व्यथांची सवय वाटणीतून त्याला व्यथा भेटते

फार आहे सुखी ऐकल्यावर गड्या चांगला दोस्तही तोंड वेंगाडतो
वेचतो दु:ख अन् मांडतो शेर मी, दु:ख ऐकून मग वाहवा भेटते

वाट पाहत तिची आज आहे उभा बघ जिथे ती न् मी रोज भेटायचो
एक घेऊन आशा मनाशीच की बोलली काल होती 'पुन्हा भेटते'

शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

🌹 मी कुणावर लिहू ? 🌹
            - महेश मोरे (स्वच्छंदी)


मी तुझ्यावर लिहू की तिच्यावर लिहू ?
ही गझल नेमकी मी कुणावर लिहू ?


पापण्यांच्या नितळ काजळावर लिहू ?
की तिने लावलेल्या गळावर लिहू ?

मालकी काळजाची तिने घेतली
मग व्यथा काळजाची कशावर लिहू ?

फास घेऊन गेल्या बळीवर लिहू 
तुर मुगावर लिहू ? की उसावर लिहू ?

मी तिच्या वेदना पाहिल्यावर गड्या
दु:ख माझे कसे कागदावर लिहू ?
         🌹 जे मला पाहिजे ते तिला भेटते 🌹
                                       - महेश मोरे (स्वच्छंदी)



जे मला पाहिजे ते तिला भेटते, जे तिला पाहिजे ते मला भेटते
शेर असतो खरा मालकीचा तिच्या अन् मला नेमकी वाहवा भेटते


फक्त हातामध्ये वेळ असली म्हणुन होत नाही गड्या माणसाचा विजय
जिद्द श्वासांत घेऊन जो धावतो त्यास जी पाहिजे ती दिशा भेटते

दु:ख सोसायची ज्यात असते धमक दु:ख त्याच्याकडे येत नाही कधी
ज्या नशिबास नसते व्यथांची सवय वाटणीतून त्याला व्यथा भेटते

फार आहे सुखी ऐकल्यावर गड्या चांगला दोस्तही तोंड वेंगाडतो
वेचतो दु:ख अन् मांडतो शेर मी, दु:ख ऐकून मग वाहवा भेटते

वाट पाहत तिची आज आहे उभा बघ जिथे ती न् मी रोज भेटायचो
एक घेऊन आशा मनाशीच की बोलली काल होती 'पुन्हा भेटते'
.       🌹 दोघांनाही कळले नाही 🌹
                       - महेश मोरे (स्वच्छंदी)


प्रेम तिलाही कळले नाही,प्रेम मलाही कळले नाही
दोघांमध्ये जे होते ते दोघांनाही कळले नाही


काठावरच्या भेटींमध्ये मश्गुल होतो दोघे आधी
बघताबघता बुडून गेलो,नंतर काही कळले नाही

लोकांबद्दल कधीच आम्ही बोलत नव्हतो म्हणून बहुधा
लोकांनाही अमुच्याबद्दल 'काहीबाही' कळले नाही

पोहायाला येत असुनही याचमुळे तर वाहत गेलो
प्रेमच आहे हे कळले पण किती प्रवाही कळले नाही

डोळ्यांमध्ये पाणी आणत इतका सुंदर तो हसला की
लपलेले त्या हसण्यामागे दु:ख जराही कळले नाही

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

         कुणावर लिहू ? 
                -    स्वच्छंदी

मी तुझ्यावर लिहू की तिच्यावर लिहू ?
ही गझल नेमकी मी कुणावर लिहू ?

पापण्यांच्या नितळ काजळावर लिहू ?
की तिने लावलेल्या गळावर लिहू ?

मालकी काळजाची तिने घेतली
मग व्यथा काळजाची कशावर लिहू ?

फास घेऊन गेल्या बळीची व्यथा
तुर मुगावर लिहू ? की उसावर लिहू ?

मी तिच्या वेदना पाहिल्यावर गड्या
दु:ख माझे कसे कागदावर लिहू

सोमवार, २ डिसेंबर, २०१९

        ❣ आरसा बोलला ❣
                 - महेश मोरे (स्वच्छंदी)


हा असा बोलला.... तो तसा बोलला
काय बोलायचे ?    भरवसा बोलला


मात जेव्हा सहज कासवाने दिली
चल पुन्हा खेळ खेळू...ससा बोलला

राहणे स्वच्छ असते कठिण केवढे
स्वच्छ राहून बघ आरसा बोलला

आग विझली तरी आग विझली म्हणुन
फार हुरळू नको...कोळसा बोलला

घाव झाला तरी नेहमीसारखी
गप्प बसली जखम पण ठसा बोलला

आस होती मला ज्यास ऐकायची
तोच नाही गड्या फारसा बोलला

ज्या दिमाखामध्ये दोन जखमा दिल्या
त्याच अदबीत तो "या, बसा !" बोलला

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

🌹वाटले टाळायचे तर टाळ मजला 🌹
                  - महेश मोरे (स्वच्छंदी)

वाटले टाळायचे तर टाळ मजला
वा विरह देवून नशिबी जाळ मजला


जर कुणाची ओल नाही चोरली मी
भेटतो मग का असा दुष्काळ मजला ?

कोठवर मी पिंजऱ्याच्या आत राहू ?
खुणविते आहे खुले आभाळ मजला

मालकीचे एक कोरे पान मी...घे!
अन् तुला वाटेल तितके चाळ मजला

मी जसा आहे तसा 'स्वच्छंद' आहे
तू ठरव ओढाळ वा नाठाळ मजला

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

.      🌹 संविधाना .... 🌹

           ®© - महेश मोरे (स्वच्छंदी)

✤┈┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈┈✤

'त्यास' तिजला अन् मलाही...संविधाना
फक्त 'तू' देतोस ग्वाही.........संविधाना


आज तू आहेस येथे अन् म्हणूनच
ठाम आहे लोकशाही...संविधाना

दार अमुच्या पिंजऱ्याचे तोडले तू
तू खुल्या केल्या दिशाही...संविधाना

पांग सगळ्यांचाच फिटणे शक्य आहे
पण तुझा फिटणार नाही...संविधाना

पुर्वजांपासून जगणे थिजविलेले
तू गड्या केले प्रवाही...संविधाना

✤┈┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈┈✤

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

एक शेर....राजकारण

स्वप्न तुला दावून उद्याचे ऐन पहाटे अवचित
सोडायाला हात तुझा मी 'राजकारणी' नाही

                        - महेश मोरे (स्वच्छंदी)
एक ईश्वर रोज असतो सोबतीला
कोण 'आई' कोण 'अम्मीजान' म्हणतो

                    - महेश मोरे (स्वच्छंदी)

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

                  🌹 दु:खे 🌹


वळ पाठीवर उठवत गेली पाठीवरची दु:खे
नख हृदयाला लावत गेली छातीमधली दु:खे

आप्तजनांचे सगळ्या डोळे पैशाखातर रडले
माझ्याखातर सरणाभवती केवळ रडली दु:खे

इतकी चिंता असेल जर का शहरांना गावाची
तर शहरांनी उसनी घ्यावी गावाकडची दु:खे

जी होती ती सोसुन जेव्हा "हुश्श !" म्हणालो तेव्हा
छळावयाला उभी राहिली त्याहीपुढची दु:खे

गरीब होते हृदय म्हणूनच सोसत त्यांना गेले
तर हृदयाच्या प्रेमामध्ये अलगद पडली दु:खे

दु:खांनी त्याच्या आत्म्याशी इतकी सलगी केली
जळून गेला देह उभा पण मागे उरली दु:खे

आनंदाने बागडली ती अंगणात हृदयाच्या
जितका त्यांना सोसत गेलो तितकी रमली दु:खे

सवय तुझ्या दु:खांची इतकी झाली आहे दु:खा..!
जमलंच तर दे या दु:खांच्या थोडी वरची दु:खे

ते त्याच्याही घरची दु:खे विसरुन जाइल अवचित
कळली जर का त्या दु:खाला माझ्याघरची दु:खे

सुखांस झाकुन जर उरली तर शाल मलाही दे तू
बघ ना थंडीने कुडकुडली माझी उघडी दु:खे

'स्वच्छंदी' तू सुखेच केवळ दाव जगाला अपुली
अन् जमली तर ठेव गड्या तू अपुल्यापुरती दु:खे

                          - महेश मोरे (स्वच्छंदी)
              मु.पो.निमसोड, ता खटाव, जि.सातारा
                               8554085101

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

          🌹 तुला अंदाज आहे का ? 🌹
………………………………………………………………

किती हृदयात थरथरते,  तुला अंदाज आहे का ?
व्यथा केव्हा जखम करते,तुला अंदाज आहे का ?


प्रसंगी डाव नशिबाचा तिच्या हातात असताना
कुणासाठी सखी हरते, तुला अंदाज आहे का ?

तसा तर सिद्ध ही नाही तुझ्यावर दोष छळण्याचा
जिवाला कोण पोखरते,  तुला अंदाज आहे का ?

जखम असली चिघळलेली, तरी तू स्पर्श केल्यावर
कशी हृदयातली भरते,  तुला अंदाज आहे का ?

स्वत:ला सावरत नाही...खरे तर माय तारेवर
कुणाचा तोल सावरते, तुला अंदाज आहे का ?

………………………………………………………………                   
                   महेश मोरे (स्वच्छंदी)
निमसोड, ता.खटाव, जि.सातारा  415538
                       8554085101

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

धडपडणाऱ्याला चालवणे...काम तयाचे असते
कुठे जायचे, कसे जायचे ?...रस्ता सांगत नाही

                                               - स्वच्छंदी

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

.     🌹 चेहरा सांगतो🌹
                 - स्वच्छंदी


ती मला सांगते, मी तिला सांगतो
पण खरे काय ते....चेहरा सांगतो


जीव झुरतो किती आठवांनी तिच्या
कंठ घुमतो तसा...पारवा सांगतो

हे कितीही मुखवटे तुम्ही वापरा
पण खरा कोणता ?...आरसा सांगतो

तुणतुण्याची कथा लावणी सांगते
पैंजणाची व्यथा..चौफुला सांगतो

पापण्यांनी जरी अडविली आसवे
दु:ख हृदयातले.....हुंदका सांगतो

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

राहिली दोघे सुखाने आजवर माझ्यासवे
वेदना बहिणीप्रमाणे.....दु:ख भावासारखे

                                     - स्वच्छंदी

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

                🌹 ...नाही का ? 🌹
                                    - महेश मोरे (स्वच्छंदी)


'ती' गेल्यावर आयुष्याची होळी होते........नाही का ? 
आठवणींनी रोज पापणी ओली होते........नाही का ?



प्रवाहासवे वाहत असता केवळ संशय आल्याने

दिशाहीन ह्या संसाराची होडी होते.........नाही का ?

शेर जगाला आवडणारा लिहायचाच तर दु:खांशी

मैत्री जितकी कराल तितकी थोडी होते .....नाही का ?

पाण्यामध्ये तितके सावध मासेसुद्धा नव्हते रे 

काठावरती तयार जितके कोळी होते ........नाही का ?

मुलगी होते, बहीण होते, पत्नी, आई, आज्जीही

दु:खे सोसत मुलगी लवकर मोठी होते ........नाही का ?

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

🌹 लपून राहिलाच पण......... 🌹
                       - महेश मोरे (स्वच्छंदी)

तिथेच श्वास थांबला बघून वेगळे वळण
तिथेच वाट थांबली नि लाभले निवांतपण


कसाबसा तिचा विसर मनास मीच पाडला
उरात मात्र राहिली तिचीच एक आठवण

जशा गुलाब पाकळ्या गळून रोज जायच्या
तसाच दूर चालला निघून एक-एकजण

नवीन देह पाहिजे म्हणून प्राण आतला
जुनाट कात सोडतो,जगास वाटते 'मरण'

कितीजरी उगाळले तरी उरेल नेमके
अजून एक घाव अन् अजून एक संस्करण

तसा जरी दिसायला असेल शब्द वेगळा
उभ्या जिवास जाळते स्मरण तसेच विस्मरण

अशी भरून माझिया उरात राहिली गझल
विभक्त जाहलीच तर उरेल फक्त आवरण

नको कुणाकुणासही अजून त्रास द्यायला
म्हणून मीच ठेवतो रचून आपले सरण

जरी तिने दिले मला वचन सवे जगायचे
तिच्या "बघू","बघू" मध्ये लपून राहिलाच "पण...."

गुरुवार, १८ जुलै, २०१९

.......... शेवटी
                   - स्वच्छंदी

तू मला भेटायला ये...शेवटी
पण खरे सांगायला ये...शेवटी


नाव घेउन कोण मज बिलगायचे ?
तू तरी बिलगायला ये...शेवटी

घाव तू जमतील तितके दे मला
पण जखम बांधायला ये...शेवटी

जिंदगीचा साज सुंदर जाहला
ये प्रिये, उतरायला ये...शेवटी

तो म्हणाला की,"कुणी नाही तुझे."
मग गड्या मोजायला ये...शेवटी

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

🌹 ओल नव्हती 🌹
           - महेश मोरे (स्वच्छंदी)


पानात ओल नव्हती,रानात ओल नव्हती
वर पाहिले... नभाच्या हृदयात ओल नव्हती

मिसळून चालणारा श्वासात श्वास नव्हता
जोवर तिच्या नि माझ्या नात्यात ओल नव्हती

अश्रू बनून ओल्या डोळ्यामधील पाणी
डोळ्यात साठले पण डोळ्यात ओल नव्हती

फसवून डाव साधत पाठीत वार केला
बहुतेक दुश्मनांच्या धर्मात ओल नव्हती

बसले जमून सगळे रडले कुणीच नाही
मुर्दाड माणसांच्या शहरात ओल नव्हती
🌹 जगणे जगून जावे 🌹
              - महेश मोरे (स्वच्छंदी)



निर्धास्त झोपल्याला जागे करून जावे
मस्तीत माणसाने जगणे जगून जावे

ठरवून भेट घ्यावी,बागेत मोगऱ्याची
बोलून"बाय !"त्याला,जाते म्हणून जावे

गझलेमधून काही,कवितेमधून काही
जितकी जमेल तितकी दु:खे विकून जावे

इतकी व्यथा कुणाच्या येऊ नये नशीबी
पिल्ले उडून जावी,घरटे जळून जावे

नुसते उन्हात बसुनी,रंगात येत नाही
ज्याला हवी झळाळी,त्याने पिकून जावे

आयुष्य हे तसेही असते खरे रणांगण
जमणार ज्यास नाही त्याने पळून जावे

जेव्हा पडून भेगा धरती उन्हात जळते
तेव्हातरी ढगाने,थोडे गळून जावे

उठलो पुन्हा प्रियेच्या हृदयातुनी जसे की
शहरास देत जागा खेडे उठून जावे

इतके हसून घ्यावे मृत्यूसमोरही की
दारातल्या यमाने यावे,निघून जावे

शनिवार, ५ जानेवारी, २०१९

गावे फसवी शहरे झाल्या नंतर झाली
                 By...महेश मोरे (स्वच्छंदी)


गावे 'फसवी', शहरे झाल्या नंतर झाली
जुनी माणसे घरे असुनही बेघर झाली

अच्छे दिन अन् विकास येईल दारामध्ये
हीच अपेक्षा निवडणुकीचे गाजर झाली

एकेकाळी छळून गेली व्यथा जी मजला
तुला पहाता तिची आठवण क्षणभर झाली

पत्थरपूजा नको म्हणुनी जन्म जाळला
तीच माणसे काळ बदलता पत्थर झाली

अन् शेतांच्या पोटांमध्ये खड्डे खोदत
एक टेकडी बघताबघता डोंगर झाली

सुरांबरोबर एक हुंदका दाटुन येता
ओठांवरची ओळ अचानक कातर झाली

अन् दु:खांनी जीव जाळला आतून माझा
तेव्हा तेव्हा माय सुखाची चादर झाली

जिच्यापुढे मी आयुष्याचा प्रश्न मांडला
सोडवताना प्रश्नाचे ती उत्तर झाली

स्पर्श प्रियेचा होता गंधित झाले पाणी
आणि मिठाची बघताबघता साखर झाली

भूतकाळ मी गुंफत होतो शब्दांमध्ये
पोत निसटता एक आठवण घरभर झाली

वळता वळता तिने टाकली नजर अशी की
काळजात या नुसती थरथर थरथर झाली

गंध आतला अमर व्हावयासाठी केवळ
एक पाकळी फुलाबरोबर अत्तर झाली

विरहामधल्या नाजूक जखमा भरता भरता
मधुमिलनाची एक जखम ओठावर झाली
                 

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...