सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

                  🌹 दु:खे 🌹


वळ पाठीवर उठवत गेली पाठीवरची दु:खे
नख हृदयाला लावत गेली छातीमधली दु:खे

आप्तजनांचे सगळ्या डोळे पैशाखातर रडले
माझ्याखातर सरणाभवती केवळ रडली दु:खे

इतकी चिंता असेल जर का शहरांना गावाची
तर शहरांनी उसनी घ्यावी गावाकडची दु:खे

जी होती ती सोसुन जेव्हा "हुश्श !" म्हणालो तेव्हा
छळावयाला उभी राहिली त्याहीपुढची दु:खे

गरीब होते हृदय म्हणूनच सोसत त्यांना गेले
तर हृदयाच्या प्रेमामध्ये अलगद पडली दु:खे

दु:खांनी त्याच्या आत्म्याशी इतकी सलगी केली
जळून गेला देह उभा पण मागे उरली दु:खे

आनंदाने बागडली ती अंगणात हृदयाच्या
जितका त्यांना सोसत गेलो तितकी रमली दु:खे

सवय तुझ्या दु:खांची इतकी झाली आहे दु:खा..!
जमलंच तर दे या दु:खांच्या थोडी वरची दु:खे

ते त्याच्याही घरची दु:खे विसरुन जाइल अवचित
कळली जर का त्या दु:खाला माझ्याघरची दु:खे

सुखांस झाकुन जर उरली तर शाल मलाही दे तू
बघ ना थंडीने कुडकुडली माझी उघडी दु:खे

'स्वच्छंदी' तू सुखेच केवळ दाव जगाला अपुली
अन् जमली तर ठेव गड्या तू अपुल्यापुरती दु:खे

                          - महेश मोरे (स्वच्छंदी)
              मु.पो.निमसोड, ता खटाव, जि.सातारा
                               8554085101

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...