सोमवार, २ डिसेंबर, २०१९

        ❣ आरसा बोलला ❣
                 - महेश मोरे (स्वच्छंदी)


हा असा बोलला.... तो तसा बोलला
काय बोलायचे ?    भरवसा बोलला


मात जेव्हा सहज कासवाने दिली
चल पुन्हा खेळ खेळू...ससा बोलला

राहणे स्वच्छ असते कठिण केवढे
स्वच्छ राहून बघ आरसा बोलला

आग विझली तरी आग विझली म्हणुन
फार हुरळू नको...कोळसा बोलला

घाव झाला तरी नेहमीसारखी
गप्प बसली जखम पण ठसा बोलला

आस होती मला ज्यास ऐकायची
तोच नाही गड्या फारसा बोलला

ज्या दिमाखामध्ये दोन जखमा दिल्या
त्याच अदबीत तो "या, बसा !" बोलला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...