रविवार, २९ मार्च, २०२०

🌹 *याहुनी माझी अवस्था वेगळी नाही* 🌹
            *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


ऊन छळते अन् कुठेही सावली नाही
याहुनी माझी अवस्था वेगळी नाही

दु:ख ज्याला भेटले..दु:खात तो आहे
सुख मिळाले ज्यास तो..तो ही सुखी नाही

टाकला गळ की गळ्याला लागण्यासाठी
पोरगी म्हणजे नदीची मासळी नाही

प्रेम असते आंधळे हे मान्य आहे पण
जन्म म्हणजे आंधळी कोशिंबिरी नाही

एक हा बस् प्रश्न पडतो रोज ताटाला
पोट आहे, भूक आहे... भाकरी नाही

फक्त दु:खांनीच सजले बंगले इथले
एकही उरली सुखांची झोपडी नाही

एवढ्यातच तू नको रे थांबवू लढणे
एवढ्यातच ही लढाई संपली नाही

शनिवार, २८ मार्च, २०२०

सोमवार, २३ मार्च, २०२०

🌹 *अजून मिळते का ?* 🌹
             *- महेश मोरे ( स्वच्छंदी)*

वेदना भरभरून मिळते का ? 
सोसल्याने अजून मिळते का ?

शोधण्यातच गड्या दिवस जातो
दु:ख केवळ बसून मिळते का ?

सूर जुळल्यामुळेच तर मिळते
प्रेम 'मिळते म्हणून' मिळते का ?

वेळ मिळताच घ्यायचे असते
एक चुंबन शिकून मिळते का ?

वर्तनाचा सुवास दरवळतो
नाव केवळ झिजून मिळते का ?

प्रेमभंगात फाटले आहे
हृदय कोठे शिवून मिळते का ?

काळजावर लिहून जे मिळते
कागदावर लिहून मिळते का ?

रविवार, २२ मार्च, २०२०

दिल्या शब्दास होतो जागलो                 
       - महेश मोरे (स्वच्छंदी)

गळा कटला तरी ना बोललो
दिल्या शब्दास मी ही जागलो

जलम काटा म्हणुन सरला तरी
कधी कोणास नव्हतो टोचलो

हवा झालो नि झालो श्वास पण
तुझ्या हृदयात नाही पोचलो

परत येणार तर नव्हतीस तू
गडे मी वाट पाहत थांबलो

तुझ्या गझलेत झालो काफिया
अलामत घेत रमलो, गुंतलो
तू गेल्यावर तुला आठवत नको एवढा रडलो होतो
आज मला ते आठवले अन् किती हसावे कळले नाही

# *- स्वच्छंदी*

बुधवार, १८ मार्च, २०२०

🌹 *सांगू शकलो नाही* 🌹
                    - महेश मोरे (स्वच्छंदी)

ऐनघडीला मनातला सल बोलू शकलो नाही
सांगायाचे बरेच होते.....सांगू शकलो नाही

गोड बोललो आणि सुखाच्या लाख वल्गना केल्या
पण मी डोळ्यांमधले पाणी लपवू शकलो नाही

श्वास पेरुनी जो निष्ठेने जगवत गेला दुनिया
पण अाम्ही त्या शेतकऱ्याला जगवू शकलो नाही

किती उंच अन् किती खुजा मी तुला कसा रे सांगू ?
अजून मी तर मलाच पुरता पाहू शकलो नाही

लाख चेहरे लाख मुखवटे बदलत गेलो मी पण
तव डोळ्यांचा एक आरसा बदलू शकलो नाही

कसा दिसाया मी होतो ते मला आठवत नाही
पण आठवतो तुझा चेहरा...विसरू शकलो नाही

दुपार झाली तरी मला हा प्रश्नच छळतो आहे
तुझ्यासारखी सकाळ मी का पाहू शकलो नाही ?

उत्सुकतेने वाचत गेलो तुझ्या कुडीचे पुस्तक
काय नेमके सुंदर होते ठरवू शकलो नाही

ती स्पर्शाने सगळ्या शंका सांगू शकली नाही
मी ओठांनी सगळ्या शंका मिटवू शकलो नाही

रविवार, १५ मार्च, २०२०

🌹 *पापण्यांमध्ये समूद्र साचत जातो* 🌹
                   *- महेश मोरे (स्वच्छंदी)*


क्षण एखादा असा आठवत जातो
पापण्यांमध्ये समूद्र साचत जातो

कराल जितकी नात्यांसोबत सलगी
तितका त्यांचा गुंता वाढत जातो

सरळ चालतो रस्तासुद्धा इथला
मी जेव्हा रस्त्याने चालत जातो

खोटा बस् आगीने काळा पडतो
अस्सल असतो तोच लकाकत जातो

येताना तर सगळे रडले होते
मर्द खरा दुनियेला हसवत जातो

शेर नि गझला निमित्त असते केवळ
गझलकार तर दु:खे वेचत जातो

धग जगण्याची ज्याच्यामध्ये असते
तो लाथेने दु:खे उडवत जातो

खरी गुलाबी प्राजक्ताची भाषा
आपण वेडे गुलाब शोधत जातो

जितका ज्यादा भाव द्याल पोरींना
तितका त्यांचा नखरा वाढत जातो

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...