शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

🌹 लपून राहिलाच पण......... 🌹
                       - महेश मोरे (स्वच्छंदी)

तिथेच श्वास थांबला बघून वेगळे वळण
तिथेच वाट थांबली नि लाभले निवांतपण


कसाबसा तिचा विसर मनास मीच पाडला
उरात मात्र राहिली तिचीच एक आठवण

जशा गुलाब पाकळ्या गळून रोज जायच्या
तसाच दूर चालला निघून एक-एकजण

नवीन देह पाहिजे म्हणून प्राण आतला
जुनाट कात सोडतो,जगास वाटते 'मरण'

कितीजरी उगाळले तरी उरेल नेमके
अजून एक घाव अन् अजून एक संस्करण

तसा जरी दिसायला असेल शब्द वेगळा
उभ्या जिवास जाळते स्मरण तसेच विस्मरण

अशी भरून माझिया उरात राहिली गझल
विभक्त जाहलीच तर उरेल फक्त आवरण

नको कुणाकुणासही अजून त्रास द्यायला
म्हणून मीच ठेवतो रचून आपले सरण

जरी तिने दिले मला वचन सवे जगायचे
तिच्या "बघू","बघू" मध्ये लपून राहिलाच "पण...."

गुरुवार, १८ जुलै, २०१९

.......... शेवटी
                   - स्वच्छंदी

तू मला भेटायला ये...शेवटी
पण खरे सांगायला ये...शेवटी


नाव घेउन कोण मज बिलगायचे ?
तू तरी बिलगायला ये...शेवटी

घाव तू जमतील तितके दे मला
पण जखम बांधायला ये...शेवटी

जिंदगीचा साज सुंदर जाहला
ये प्रिये, उतरायला ये...शेवटी

तो म्हणाला की,"कुणी नाही तुझे."
मग गड्या मोजायला ये...शेवटी

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

🌹 ओल नव्हती 🌹
           - महेश मोरे (स्वच्छंदी)


पानात ओल नव्हती,रानात ओल नव्हती
वर पाहिले... नभाच्या हृदयात ओल नव्हती

मिसळून चालणारा श्वासात श्वास नव्हता
जोवर तिच्या नि माझ्या नात्यात ओल नव्हती

अश्रू बनून ओल्या डोळ्यामधील पाणी
डोळ्यात साठले पण डोळ्यात ओल नव्हती

फसवून डाव साधत पाठीत वार केला
बहुतेक दुश्मनांच्या धर्मात ओल नव्हती

बसले जमून सगळे रडले कुणीच नाही
मुर्दाड माणसांच्या शहरात ओल नव्हती
🌹 जगणे जगून जावे 🌹
              - महेश मोरे (स्वच्छंदी)



निर्धास्त झोपल्याला जागे करून जावे
मस्तीत माणसाने जगणे जगून जावे

ठरवून भेट घ्यावी,बागेत मोगऱ्याची
बोलून"बाय !"त्याला,जाते म्हणून जावे

गझलेमधून काही,कवितेमधून काही
जितकी जमेल तितकी दु:खे विकून जावे

इतकी व्यथा कुणाच्या येऊ नये नशीबी
पिल्ले उडून जावी,घरटे जळून जावे

नुसते उन्हात बसुनी,रंगात येत नाही
ज्याला हवी झळाळी,त्याने पिकून जावे

आयुष्य हे तसेही असते खरे रणांगण
जमणार ज्यास नाही त्याने पळून जावे

जेव्हा पडून भेगा धरती उन्हात जळते
तेव्हातरी ढगाने,थोडे गळून जावे

उठलो पुन्हा प्रियेच्या हृदयातुनी जसे की
शहरास देत जागा खेडे उठून जावे

इतके हसून घ्यावे मृत्यूसमोरही की
दारातल्या यमाने यावे,निघून जावे

शनिवार, ५ जानेवारी, २०१९

गावे फसवी शहरे झाल्या नंतर झाली
                 By...महेश मोरे (स्वच्छंदी)


गावे 'फसवी', शहरे झाल्या नंतर झाली
जुनी माणसे घरे असुनही बेघर झाली

अच्छे दिन अन् विकास येईल दारामध्ये
हीच अपेक्षा निवडणुकीचे गाजर झाली

एकेकाळी छळून गेली व्यथा जी मजला
तुला पहाता तिची आठवण क्षणभर झाली

पत्थरपूजा नको म्हणुनी जन्म जाळला
तीच माणसे काळ बदलता पत्थर झाली

अन् शेतांच्या पोटांमध्ये खड्डे खोदत
एक टेकडी बघताबघता डोंगर झाली

सुरांबरोबर एक हुंदका दाटुन येता
ओठांवरची ओळ अचानक कातर झाली

अन् दु:खांनी जीव जाळला आतून माझा
तेव्हा तेव्हा माय सुखाची चादर झाली

जिच्यापुढे मी आयुष्याचा प्रश्न मांडला
सोडवताना प्रश्नाचे ती उत्तर झाली

स्पर्श प्रियेचा होता गंधित झाले पाणी
आणि मिठाची बघताबघता साखर झाली

भूतकाळ मी गुंफत होतो शब्दांमध्ये
पोत निसटता एक आठवण घरभर झाली

वळता वळता तिने टाकली नजर अशी की
काळजात या नुसती थरथर थरथर झाली

गंध आतला अमर व्हावयासाठी केवळ
एक पाकळी फुलाबरोबर अत्तर झाली

विरहामधल्या नाजूक जखमा भरता भरता
मधुमिलनाची एक जखम ओठावर झाली
                 

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

असातसाही जळणारच.....
            - स्वच्छंदी/महेश मोरे

पेटवताना उरातुनी भळभळणारच
मात्र दिवा तो असातसाही जळणारच.

याद कितीही मनामधे या लपवुन बघ
दु:ख नव्या आसवांसवे ओघळणारच

पायदळी या कळ्या कितीही चुरगाळा
गंध तयांचा पुन:पुन्हा दरवळणारच

साद प्रियेची मधूर पडता कानावर
पाय बिचारा नको तिथे बघ वळणारच

सत्य सिकंदर जगास गेला सांगुन की
सुर्य तुझाही कधीतरी मावळणारच

खोल किती तू जिवास द्यावा आयुष्या
घाव असा की भलाभला कळवळणारच

छत्र जिथे तू धरून बसला सरकारा !
त्याच गढीवर समानता कोसळणारच

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

तेव्हापासून.........!
              - स्वच्छंदी

तू मला हेटाळले ........तेव्हापासून
मी मला सांभाळले .....तेव्हापासून

स्तब्ध झाली आसवे डोळ्यांमधली
स्वप्न मी चुरगाळले ......तेव्हापासून

बोलणे होते कुठे हल्ली अपुले
भेटणे तू टाळले .........तेव्हापासून

यातनांना रोज देतो आमंत्रण
दु:ख 'ते' रक्ताळले .....तेव्हापासून

साथ माझी सोडली स्वप्नांनीही
अन् ह्रदय भेगाळले.......तेव्हापासून

मी न माझ्या लागलो बघ हाताला
मन तुझ्यावर भाळले ...तेव्हापासून

मंद झाला काळजाचा ठोकाही
मी तुला कवटाळले ....तेव्हापासून

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...