रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

🌹गझल🌹
-----------------------------------------
              *नक्की*
                   *- स्वच्छंदी*
-----------------------------------------
तिचे वेगळे बेत आहेत नक्की
तसे स्पष्ट संकेत आहेेत नक्की

खुळ्यासारखे हासतो मात्र अमुची
मने हुंदके देत आहेत नक्की

कशी हेलकावून जातेय होडी
कुणी गुंड नावेत आहेत नक्की

तसे भोवताली कळीच्याच काटे
तिची काळजी घेत आहेत नक्की

जगाया शिकावे असे ज्यात नाही
धडे तेच शाळेत आहेत नक्की

गझल वाचताना तिची याद यावी
असे शेर गझलेत आहेत नक्की

किती चाललो पण मला हे कळेना
कुठे पावले नेत आहेत नक्की ?

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

गझल........
            - स्वच्छंदी

शोषकांनी शोषिलेले शोषितांचे रक्त आहे
हे गुलामांच्या मढ्यांवर बांधलेले तख्त आहे

दावणीला बांधलेली शोषितांची जिंदगानी
आज त्याची रोख किंमत एक भाकर फक्त आहे

कोण करतो सांग हल्ली शोषितांची काळजी
देवसुद्धा वाटते त्या शोषकांचा भक्त आहे

काल त्यांनी बंद केली बोलणारी चार तोंडे
आजही त्यांचा पहारा भोवताली सख्त आहे

आजवरती शोषिताला ना दिले बोलून कोणी
वेदना त्याच्या मनाची आजही अव्यक्त आहे

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

गझल.....
जिंदगीचे डाव मोठे बेरके
                      - स्वच्छंदी

जिंदगीचे डाव मोठे बेरके
चेक म्हणणाऱ्या वजीरासारखे

दाखवाया फक्त प्यादे चालते
मग बळी बिन्धास जाती म्होरके

बघ सुखाला झेलतो प्रत्येकजण
दु:ख भोळे होत जाते पोरके

बंदुकांनी ठार ज्यांना मारले
लोक त्यांची बांधताती स्मारके

अन् घरे भूकंप जेव्हा पाडतो
माय मरते पोर उरते बारके

गझल : परवानगी द्या 
             - स्वच्छंदी/ महेश मोरे

 हात गुंफायची परवानगी द्या
ओठ चुंबायची परवानगी द्या

शोध घेईन मी तिचिया तळाचा
खोल डुंबायची परवानगी द्या

बंद होईल तगमग ह्या जिवाची
राज खोलायची परवानगी द्या

वादळांनो कधीही या, परंतू
रान पेरायची परवानगी द्या

दोष होता कुणाचा सांगतो मी
दोष शोधायची परवानगी द्या

भूक ताटात येताना म्हणाली
कोर मागायची परवानगी द्या

शुभ्र सदऱ्यातही शोभेन मी बस्
झूठ बोलायची परवानगी द्या

गुरुवार, ४ मे, २०१७


................आ युष्य आयुष्य असते आशेचे अत्तर नशीब नसते इतके सुंदर. भालावरती कोण लिहीते ? ह्या प्रश्नाला नाहीच उत्तर माणसातला "माणूस" मेला देव बनवला काळा पत्थर. जीवन बघ तू मोजून कितीही जन्मा-मरणामधले अंतर. आयुष्याची मजाच न्यारी आधी वेदना जखमा नंतर... ................स्वच्छंदी(महेश)

बुधवार, १५ मार्च, २०१७


जुन्या आठवणी......... ........जशा आठवतील तशा *बैलगाडीचा साठा* दिस ढळाया निघता आलं दारी गिऱ्हाईक, म्हणे लाकूड कुजकं तरी जळणाला ठीक. खत, जळण, वैरण उभं शिवार वाहिलं, धन्यासोबती चांगलं दिस वंगाळ पाहिलं. साठा बैलांच्या गाडीचा असा मोडून पडला, बैलं दावणीची गेली तेव्हा म्हातारा रडला. गोड चाबकाची साद, आणि नांगराची गाणी, अंगा धोतर फाटकं ओठी शीळ मंजुळवाणी अशी शिरमंती शिवारा दरपावलात व्हती, डोई आभाळबी व्हतं अन् पायाखाली माती. लोक जिमिनीव होते, दर मालाला नव्हता, तरी कष्टाच्या घामाला वास आनंदाचा व्हता. धनी राजावानी भासे दिसें रथ बैलगाडी, राणी शोभे मालकीण जवा नेसे नवी साडी अशा किती आठवणी गोड साठ्यात साठल्या, आज त्याच्या लाकडांनी चुली दारात पेटल्या. सारं बदललं बाबा बदलली जुनी गाणी, खोल काळजात आता नुस्त्या जुन्या आठवणी. ...................... *स्वच्छंदी*

मंगळवार, २० डिसेंबर, २०१६


सकाळ ......................................... सुखांच्या शालीखाली वेदनेला झाकायचं, सारंकाही विसरून पाऊल पुढे पुढे टाकायचं. चढ उतार काय येतच असतात आयुष्यात आपलीही आठवण रहावी इतरांच्या भविष्यात मजाकमजाकमध्येसुद्धा नेहमी हसत जगावं, आनंदाच्या वाटेवरती आयुष्याचं गाणं व्हावं. नव्या दिवसाच्या गळ्यात घालावी नव्या जगाची माळ, काळाच्याआधी अनुभवावी नवी नवेली सकाळ.......... ..............स्वच्छंदी महेश

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...