बुधवार, २९ एप्रिल, २०२०

🌹 हुमान..कोडे आहे का ? 🌹
                 ©- महेश मोरे (स्वच्छंदी)

सामान्याला सहजासहजी सुटण्याजोगे आहे का ?
जीवन म्हणजे चकवा, गुंता, हुमान..कोडे आहे का ?

ऐन तिशीतच देह येथला किती लागला वाकाया
जगण्यावर इच्छांचे सांगा इतके ओझे आहे का ?

नजर पेरण्याच्या आधी बस् हवे मला हे बघायला
तिच्या पापण्यांइतके ती'चे मनही ओले आहे का ?

फक्त एकदा फसले होते तिला दिलेल्या शब्दाने
पुन्हापुन्हा हे फसायला मन साधेभोळे आहे का ?

दोन चुंबने दिली मला अन् विचारते की, "भरले का ?"
भरायला सांगा माझे मन म्हणजे पोते आहे का ?

जिथे तिथे ह्या सुखावरी त्या दबाव दिसतो दु:खाचा
वयामधेही दु:ख सुखाहुन थोडे मोठे आहे का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...