सोमवार, १५ जून, २०२०

🌹 *हरएक श्वासात भिनतेस तू........* 🌹

    ©® -  महेश मोरे (स्वच्छंदी),सातारा
              8554085101

ठरवून देतो शहारा शरीरास त्या गूढ स्पर्शात असतेस तू
भरतेस अस्सल सुखांनीच आयुष्य अन् धुंद बरसात करतेस तू

हळुवार स्पर्शून जाते किनाऱ्यास ती लाट पाण्यातली तू सखे
पाण्यास असते तुझी काळजी आणि अपुल्याच खेळात रमतेस तू

तो चंद्र फिरतो जसा भोवताली नि धरणी जशी त्यास दुर्लक्षिते
मी घालतो नित्य घिरट्या तशा आणि अपुल्याच नादात फिरतेस तू

भिनतो फुलारून प्राजक्त देहात तेव्हा तुझी याद येते मला
अन् श्वास होतो गुलाबी गुलाबून ज्या रंग-गंधात खुलतेस तू

अत्तर जसे गंध देते स्वभावास, भिनते जसे रोमरोमामधे
अगदी तशी हाय ! हरएक स्वप्नात,  हरएक श्वासात भिनतेस तू

सोमवार, ८ जून, २०२०

🌹 *म्हणून ये बघायला* 🌹
                - महेश मोरे (स्वच्छंदी)


नको उशीर व्हायला म्हणून ये बघायला
नकोच साथ आपली अशीतशी सुटायला

ऋतू जसा सरायचा तसा निघून चाललो
उशीर लागतोच ना मनातुनी निघायला

नकोस देउ दु:ख वा नको नवीन वेदना
तुझी जुनीच आठवण पुरेल मज छळायला

उसंत बस् पुरेलशी कळीस दे फुलायला
कितीक वेळ लागतो सुवास दरवळायला ?

जसे सुचायचे सखे अधीर काव्य तुजवरी
हवा तसाच शेर बस् तुझ्यावरी सुचायला

रविवार, ३१ मे, २०२०

इलाज नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)


आयुष्याला सलतो आहे..इलाज नाही
विरह तुझा मज डसतो आहे..इलाज नाही

जरी दिली तू टाळी नाही मला एकही
तुझी वाहवा करतो आहे..इलाज नाही

रस्ता बदलुन तू वळणावर वळल्यापासुन
नको तिथे मी वळतो आहे..इलाज नाही

तुला भेटले नाही घरटे हक्काचे अन्
मीही वणवण फिरतो आहे..इलाज नाही

चार विषारी दात काढले तेव्हापासुन
जो-तो येतो, छळतो आहे..इलाज नाही

इतकी वर्षे झाली पहिला गुलाब देउन
हात अता थरथरतो आहे..इलाज नाही

वाटाघाटी कितीक केल्या आयुष्या मी
अजूनसुद्धा करतो आहे..इलाज नाही

मंगळवार, २६ मे, २०२०

🌹 *भिजून जावे म्हणतो* 🌹
                   *- स्वच्छंदी*

पापणीतल्या थेंबांमध्ये भिजून जावे म्हणतो
मी जाताना तुझी आसवे पुसून जावेे म्हणतो

काठावरती येण्याचीही नको व्हायला इच्छा
प्रेमामध्ये तुझ्या एवढे बुडून जावे म्हणतो

पडदाबिडदा अन् टाळ्यांची वाट कशाला पाहू ?
मी शेवटच्या घंटेआधी निघून जावे म्हणतो

नको एवढ्या निर्दयतेने डाव मोडला माझा
आयुष्या मी तुलाच आता पिसून जावे म्हणतो

उच्चप्रतीचे अत्तर होणे असेल ज्याच्या नशिबी
त्याने पुरत्या आनंदाने सुकून जावे म्हणतो

मरायचे तर नक्की आहे वेळ तशी आल्यावर
कसे जगावे हे त्याआधी शिकून जावे म्हणतो

वादामध्ये जेव्हातेव्हा तुझेच खोटे पचते
मी माझेही सत्य जरासे पचून जावे म्हणतो

शनिवार, २३ मे, २०२०





बोलत नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)


माझ्याबद्दल कधी कुणाला सांगत नाही
वळून बघते, हसतेही पण...बोलत नाही

एक चांदणी लुकलुक करते..अन् मावळते
त्याच अदेवर चंद्र रात्रभर झोपत नाही

खरे सांगतो..बाई म्हणजे असा डोह की
जन्म संपतो..थांग कुणाला लागत नाही

तिला पाहिजे तसा तसा मी बदलत गेलो
अन् ती म्हणते मनासारखा वाटत नाही

मी दिसलो की उगाच कुजबुज कुजबुज करते
वेळ बदलते..स्वभाव काही बदलत नाही

जशी यायची.. तशीच येते पाणवठ्यावर
मी ही असतो पाय तिचा पण घसरत नाही

मुखपृष्ठाला बघून जो तो मते ठरवितो
अख्खे पुस्तक कुणीच हल्ली वाचत नाही

शुक्रवार, १५ मे, २०२०

8+8+4

🌹 *सांगा ना..मी कोठे माझा होतो ?* 🌹
             - महेश मोरे (स्वच्छंदी)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तिच्या गुलाबी मिठीत जेव्हा होतो
सांगा ना....मी कोठे माझा होतो ?

तुलना अमुची कशी व्हायची होती
ती मंदिर..... मी पडका वाडा होतो

ती दिसली की बाकी काही नाही
आठवणींनी डोळा ओला होतो

खेळायाचे तर सगळ्यांना असते
वजीर कोणी..कोणी प्यादा होतो

निर्णयांमधे गफलत आधी होते
आयुष्याचा नंतर पचका होतो

आकार तुला कसा द्यायचा होता
मी रबराचा तुटका साचा होतो

देवळातला देव झोपतो तेव्हा
माणसातला माणुस जागा होतो

हिरवा, पिवळा, निळा, तांबडा, काळा
मी नक्की कुठल्या रंगाचा होतो ?

फुलासारखा वागत आहे हल्ली
कोणेकाळी मीही काटा होतो


 *अधिकचे शेर.....*

ती लग्नाच्या आधी वेडी होते
अन् तो लग्नानंतर वेडा होतो

गुरूमुळे बस् जादा काही नाही
आयुष्याचा रस्ता सोपा होतो

मंगळवार, १२ मे, २०२०

🌹 थांबेल भळभळ कधीतरी 🌹
                  - महेश मोरे (स्वच्छंदी)


जखमा जुन्या भरतील अन् थांबेल भळभळ कधीतरी
बस् याचसाठी सोसतो.. संपेल ही कळ कधीतरी

थांबेल श्वासांची तलफ अन् एक वळवळ कधीतरी
त्याच्या जरा आधी गडे! तू ये मला छळ कधीतरी

छातीत खंजिर खोच तू अन् सांग बस् एवढे मला
पाठीवरी उठलेत ते मुजतील का वळ कधीतरी ?

तू दे कळीला जेवढी आहे हवी ती उसंत बस्
उमलेल फुल काट्यात अन् पसरेल दरवळ कधीतरी

इतक्याचसाठी लावले दारास अडसर खरेखुरे
ठरवून माझ्याही घरी येईल वादळ कधीतरी

दुनिया जशी हसली मला गेलीस तूही हसून पण
लागेल विरहाची तुझ्या हृदयासही झळ कधीतरी

डोहाप्रमाणे हा उभा आहे तुझ्या मी घरापुढे
बस् एकदा उतरून ये..भर एक ओंजळ कधीतरी

वर सुखाचा चेहरा आत दु:खे वर सुखाचा चेहरा माय म्हणजे कातळामधला झरा प्रीत म्हणजे रातराणीची जखम प्रीत म्हणजे जीवघेणा मोगरा जन्म झाला श...